९. बळवंतराव घाटे प्रशाला 

सन १९८८. त्याकाळी यावली गावात जिल्हा परिषदेची एकमेव प्राथमिक शाळा होती. पहिली ते चौथी असे चार वर्ग शाळेत भरत. चौथीच्या पुढे शिकण्यासाठी विद्यार्थ्यांना तडवळे येथील ‘श्री यशवंतराव चव्हाण प्रशाला’ येथे जावे लागत. तीन ते चार किलोमीटरचे हे अंतर विद्यार्थी रोज जात येत असत. यावली आणि तडवळे या दोन खेडयांमध्ये भोगावती नदी वाहते. विद्यार्थ्यांना रोज ही नदी पार करून जावे लागे. पावसाळ्यात हे शक्य नसे. इर्ले येथील पुलावरून लांबचा वळसा घालून शाळेला जाणे शक्य होते. परंतु ते अंतर १० किलोमीटर पेक्षा जास्त होत असे. त्याकाळी वाहने नसत  त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अशक्य होई. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात खंड पडे. कित्येकदा तर शाळेतील शिक्षक यावली येथे येऊन यावली च्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेत. 

त्याकाळी गावाचे सरपंच श्री. कृष्णाजी महादेव कळभट हे होते. श्री. कळभट स्वतः पदवीधर होते आणि तडवळे येथे श्री. यशवंतराव चव्हाण विद्यालयात माध्यमिक शाळेत शिक्षक होते. कळभट सरांना हे सारे खुपत होते. परंतु त्यास उपाय सापडत नव्हता. माध्यमिक शाळा यावलीत सुरू करणे सोपे काम नव्हते. सरकारी परवानग्या, लागणारा निधी याचा मेळ बसवणे कळभट सरांना अवघड होते.

अण्णासाहेब आणि कळभट सर यांचा चांगला स्नेह होता. कळभट सर अण्णासाहेबांचा सन्मान करत. अण्णासाहेब आता थकले होते. तरी त्यांच्या यावलीच्या चकरा कमी झाल्या नव्हत्या. असेच एकदा अण्णासाहेब यावलीला आले असताना कळभट सर अण्णासाहेबांना मुद्दाम भेटायला आले. त्यांनी सारा विषय अण्णासाहेबांच्या  कानावर घातला. अण्णासाहेबांना विषयाचे गांभीर्य समजण्यास वेळ लागला नाही. अण्णासाहेबांनी यावली येथे माध्यमिक शाळा सुरु करण्याचा मनोदय केला आणि तो बोलूनही दाखवला. 

त्याकाळी अण्णासाहेबांचे कनिष्ठ चिरंजीव विठ्ठलराव मुंबईत व्यवसाय करत होते. शाळेची परवानगी घेण्याची कामगिरी त्यांनी विठ्ठलराव यांच्यावर सोपवली. विठ्ठलरावांचे  मेहुणे श्री. दिनेश अफजलपुरकर सरकारात मोठ्या हुद्यावर होते. विठ्ठलराव यांनी कळभट सर आणि मुकुंदराव घाटे यांना मुंबईस बोलावून घेतले आणि त्यांची श्री. दिनेश अफजलपुरकर यांच्याशी भेट घडवून आणली. योग्य मार्गदर्शन मिळाले आणि पाहता पाहता शाळेला शासकीय मंजुरी मिळाली. विशेष म्हणजे शासकीय परवानगी पाचवी आणि आठवी असे दोन्ही वर्ग सुरू करण्यास मिळाली. 

दुसऱ्या बाजूला शाळा चालवण्यासाठी एका विश्वस्त संस्थेची स्थापना करण्याची सूचना अण्णासाहेब यांनी केली. श्री. आदिनारायण महाराज हे घाटे घराण्याचे मूळ पुरुष. अण्णासाहेबांनी आदिनारायण महाराज यांच्या नावे संस्था सुरू करण्याची सूचना गावकऱ्यांना केली. 

गावकऱ्यांनी मिळून ९ सदस्यांची कार्यकारिणी स्थापन केली. अध्यक्षपदी श्री. मुकुंद बाळकृष्ण घाटे, सचिवपदी श्री. कृष्णाजी महादेव कळभट आणि उपाध्यक्षपदी श्री. अरुण निवृत्ती ढोरे यांची निवड करण्यात आली. अण्णासाहेबांचे प्रतिनिधी या नात्याने त्यांचे जेष्ठ चिरंजीव श्री. प्रभाकरराव घाटे यांना कार्यकारी मंडळात नियुक्त करण्यात आले. 

परंतु नियतीला वेगळेच मंजूर होते. २५ ऑक्टोबर १९८९ रोजी अण्णासाहेबांचे वृद्धापकाळाने निधन झाले. संस्थेचे सचिव आणि गावचे सरपंच श्री. कळभट सर यांचे अकाली निधन झाले. संस्थेने श्री. प्रभाकरराव घाटे यांना सचिवपदी नियुक्त केले. प्रभाकररावांनी संस्थेची धुरा सक्षमपणे सांभाळून शाळा नावारूपाला आणली. अण्णासाहेबांचे स्वप्न त्यांच्या पश्चात त्यांच्या चिरंजीवांनी पूर्ण केले. 

शाळेची पहिली दहावीची तुकडी १९९३ साली निघाली तेंव्हापासून शाळेचा बोर्डाचा निकाल सातत्याने १००% लागतो. आजही शाळेत २५० विद्यार्थी विनामूल्य शिक्षण घेतात. शाळेसाठी दोन एकर स्वतंत्र जमीन विकत घेण्यात आली आणि त्यावर टुमदार इमारत बांधण्यात आली. शाळा सभागृह, खेळाचे मैदान, कंपाऊंड, प्रयोग शाळा, संगणक केंद्र, इत्यादी सुविधांनी सुसज्ज आहे. यात घाटे कुटुंबाचे योगदान फार मोठे आहे.