१०. संत येती घरा …
“वर्षत सकळ मंगळी । ईश्वरनिष्ठांची मांदियाळी ।
अनवरत भूमंडळी । भेटतो भूता ।।”
“सर्व जगात मंगल पसरवणाऱ्या संतांचा सतत सहवास सर्वाना व्हावा” या पसायदानातील श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीस अनुसरून अण्णासाहेब यांना संतांचा सतत सहवास लाभला. संपूर्ण मानसिक विकासासाठी केवळ ग्रंथ वाचनातून ज्ञानार्जन पुरेसे नाही तर त्यासाठी गुरुजनांचा सहवास आवश्यक आहे या ठाम विचारांचे अण्णासाहेब होते. आणि त्यास अनुसरून अण्णासाहेबांनी संत पुरुषांच्या भेटीचा आणि सहवासाचा प्रयत्नपूर्वक ध्यास घेतला आणि देवकृपेने त्यांच्या प्रयत्नांची फलपूर्ती झाली.
व्यावसायिक कारकिर्दीत आणि त्यानंतर एकनाथ संशोधन मंदिराच्या कामानिमित्त अण्णासाहेबांचा संबंध थोर पुरुषांशी आला. या साऱ्या थोर मंडळींशी अण्णासाहेबांच्या केवळ भेटीगाठी होत नसत तर अण्णासाहेब त्यांना आवर्जून घरी घेऊन येत असत आणि त्यांचा आदर सत्कार करत. किंबहुना हे थोर पुरुष सहसा अण्णासाहेबांच्या घरीच उतरत.
आचार्य विनोबा भावे
अण्णासाहेबांचे आचार्य विनोबा भावे यांच्याशी खूप चांगले संबंध होते. अण्णासाहेब विनोबाजींचा नितांत आदर करीत. आचार्य विनोबाजींचा वेगळा परिचय देणे आवश्यक नाही. विनोबाजी भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधीजींचे ते अनुयायी. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. ब्रिटिश राज्यविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. विनोबाजी पुढे ‘सर्वोदयी नेते’ म्हणून प्रसिद्ध झाले.
विनोबाजींचे अनुयायी श्री. शिवाजी भावे अण्णासाहेबांच्या परिचयाचे होते. शिवाजीरावांनी अण्णासाहेबांची विनोबाजींशी प्रथम भेट घडवून आणली. विनोबाजींच्या भूदान चळवळीने प्रभावित होऊन अण्णासाहेबांनी यावली येथील काही जमीन तेथील कुळांना दान केली. अण्णासाहेबांची १९४८ च्या सुमारास जालन्याला बदली झाली होती. त्याच सुमारास विनोबाजी जालन्यात आले होते. विनोबाजी अण्णासाहेबांकडेच उतरले आणि काही दिवस तेथे राहिले. अण्णासाहेब आणि त्यांच्या कुटुंबाने विनोबांचा मनापासून पाहुणचार केला.
पांडुरंग शास्त्री आठवले
पांडुरंग शास्त्री आठवले, हे एक तत्त्वज्ञ, आध्यात्मिक नेते, सामाजिक क्रांतिकारक, आणि धर्म सुधारणावादी होते. भगवद्गीता, वेद आणि उपनिषदांवर प्रवचनासाठी प्रसिद्ध असलेले दादाजी त्यांच्या निःस्वार्थ कार्यासाठी आणि धर्मग्रंथातील उत्कृष्ट ज्ञानासाठी देखील ओळखले जातात. त्यांनी १९५४ मध्ये ‘स्वाध्याय परिवार’ची स्थापना केली. ‘स्वाध्याय’ ही भगवद गीतेवर आधारित स्वयं-अध्ययन प्रक्रिया आहे. सर्व भारतभर आणि भारताबाहेर स्वाध्याय परिवाराचे अनुयायी आहेत. पांडुरंग शास्त्री यांना पुढे जाऊन भारत सरकारने पद्मविभूषण पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान केला.
पांडुरंग शास्त्री आणि अण्णासाहेबांचे अतिशय आत्मीयतेचे संबंध होते. एकनाथ संशोधन मंदिरात पांडुरंग शास्त्री यांचे प्रवचन अण्णासाहेबांनी अनेकवेळा आयोजित केले होते. पांडुरंग शास्त्री त्यांच्या औरंगाबाद मुक्कामी अण्णासाहेबांच्याच घरी राहत.
संत तुकडोजी महाराज
तुकडोजी महाराज यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखले जाते. अंधश्रद्धा निर्मूलन व जातिभेदाच्या निर्मूलनासाठी त्यांनी भजनांचा आणि कीर्तनाचा प्रभावीपणे वापर केला. यासाठी त्यांनी मराठी व हिंदी भाषांमध्ये काव्यरचना केली. तुकडोजी महाराजांनी मोझरी येथे ‘गुरुकुंज आश्रमा’ची स्थापना केली. तुकडोजी महाराज हे आधुनिक काळातील महान संत होते.
१९५५ साली अण्णासाहेब हैद्राबाद येथे सत्र न्यायाधीश म्हणून काम करत होते. हैद्राबाद येथे संत तुकडोजी महाराज आणि त्यांच्या भक्तांचा मुक्काम एक आठवडा अण्णासाहेबांच्या घरी होता. अण्णासाहेबांनी संत तुकडोजी महाराज्यांच्या कीर्तनाचे आणि भजनांचे आयोजन केले त्यांच्या रसाळ आणि उत्कट भजनांचा आनंद अण्णासाहेब पुढे अनेक वर्षे बोलून दाखवत असत.
वारकरी संप्रदाय
अण्णासाहेब वारकरी संप्रदायाचे गाढे उपासक. अण्णासाहेबांची कार्तिकी एकादशीची पंढरपूर वारी कधी चुकली नाही. वारकरी पंथातील अनेक मान्यवरांशी अण्णासाहेबांचा जवळचा संबंध होता. त्यात गुरुवर्य मामासाहेब दांडेकर आणि ह. भ. प. श्री. धुंडा महाराज या दोघांशी अण्णासाहेब यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते.
प्राचार्य मामासाहेब दांडेकर हे महाराष्ट्रातील विचारवंत, शिक्षणतज्ञ, सर परशुरामभाऊ महाविद्यालयात तत्त्वज्ञान विषयाचे प्राचार्य, संत साहित्याचे अभ्यासक, आणि वारकरी संप्रदायाचे प्रवचनकार होते. ह.भ.प. धुंडा महाराज देगलूरकर हे विसाव्या शतकातील आधुनिक संत होत. महाराज वारकरी संप्रदायातील एक ज्येष्ठ कीर्तनकार, प्रवचनकार.
या दोघांचा आणि अण्णासाहेबांचा संबंध व प्रेम शब्दात वर्णन करता येणे शक्य नाही. या दोघांच्या बहुतांशी कार्यक्रमात अण्णासाहेब यांचा प्रमुख भाग असे. धुंडा महाराज तर त्यांना बंधूच मानत. महाराजांचा आणि अण्णासाहेबांचा पन्नास वर्षाहून अधिक स्नेह संबंध राहिला. महाराजांच्या हृदयाची शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली, त्यावेळेस महाराज महिनाभर अण्णासाहेबांच्या घरी औरंगाबाद येथे राहिले. अण्णासाहेब आणि त्यांच्या कुटुंबीयांनी महाराजांची मनोभावे सेवा केली.
चिन्मय मिशन
अण्णासाहेबांचे चिन्मय मिशन या संस्थेची घनिष्ठ संबंध होते. १९५७ च्या डिसेंबर महिन्यात अण्णासाहेबांच्या पुढाकाराने ‘गीताज्ञानयज्ञ’ औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात स्वतः गुरुदेव स्वामी चिन्मयानंदजी उपस्थित होते. स्वामीजींनी यज्ञ चांगला आयोजित केल्याबद्दल संतोष व्यक्त केला आणि अण्णासाहेबांचे अभिनंदन केले. पुढे अण्णासाहेबांनी एकनाथ संशोधन मंदिरात सतत चार वर्षे चिन्मय मिशनचे गीता ज्ञान यज्ञ आयोजित केले. या कार्यक्रमांसाठी स्वामी पुरुषोत्तमानंद हजर असत. स्वामी चिन्मयानंद आणि स्वामी पुरुषोत्तमानंद यांचे औरंगाबाद येथील वास्तव्य अण्णासाहेब यांच्या घरीच असे.
अण्णासाहेबांना रामकृष्ण मिशन बाबतही अत्यंत आस्था होती. रामकृष्ण मिशनचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय कीर्तीचे स्वामी रंगनाथानंद यांचा सहवास देखील अण्णासाहेबांना लाभला. स्वामी रंगनाथानंद दोन वेळेस औरंगाबाद येथे येऊन गेले. अण्णासाहेबांनी स्वामीजींचा सप्रेम आदर सत्कार केला.
संतांची मांदियाळी
याव्यतिरिक्त अनेक संत पुरुषांचा सहवास अण्णासाहेबांना लाभला. त्यापैकी काही प्रमुख नावे पुढील प्रमाणे घेता येतील.
कान्हरगडच्या संत रामदास आश्रम यांचा अण्णांनी गुरुमंत्र घेतला होता. अण्णासाहेब अनेक वेळा कान्हरगडला जाऊन आले होते. स्वामीजी आणि त्यांच्या शिष्यमंडळींचा मुक्काम एक आठवडा सिकंदराबाद येथे अण्णा साहेबांच्या घरी होता. अण्णासाहेब औरंगाबाद येथे असताना १९५१ साली अनंतदास रामदासी हे अत्यंत तेज:पुंज तपस्वी जवळजवळ एक महिना अण्णासाहेब यांच्या घरी राहून गेले. अण्णासाहेबांचा परमपूज्य गुरुदेव रानडे यांच्याशी निकटचा संबंध होता. अण्णासाहेब गुरुदेव रानडे यांना भेटण्यासाठी अनेक वेळा पुण्यात जात.
युगपुरुष रमणमहर्षींच्या अन्नमलाई येथील अरुणाचलाश्रमात अण्णासाहेब काही दिवस राहिले होते आणि त्यांच्या सहवासाचा आणि कृपेचा लाभ त्यांनी मिळवला होता. परमपूज्य गुरुवर्य वामनरावजी गुळवणी आणि दत्तमहाराज कवीश्वर यांच्याशी देखील अण्णासाहेबांचे घनिष्ठ संबंध होते त्यांनी अनेक वेळा औरंगाबाद येथे येऊन एकनाथ संशोधन मंदिरास भेटी दिल्या होत्या.
याशिवाय त्यांना जगद्गुरु शंकराचार्य जिरेस्वामी महाराज सातारा, गजानन महाराज अक्कलकोट, संकेश्वर जगद्गुरु शंकराचार्य कल्याण सेवक महाराज, पूज्य बालस्वामी महाराज डोंबिवली, रंगनाथ महाराज परभणीकर अशा अनेक थोर पुरुषांची त्यांना कृपा आणि सहवास लाभला. जिरे स्वामी महाराजांनी तर अण्णासाहेबांना ‘महाराष्ट्र भूषण’ अशी पदवी देऊन त्यांचा गौरव केला होता.
राजकीय वर्तुळ
अण्णासाहेब स्वतः राजकारणात कधीच नव्हते. परंतु समाजातील कार्यशील व्यक्तींना दाद देणाऱ्या अनेक राजकीय पुढाऱ्यांनी अण्णासाहेबांचा वेळोवेळी सन्मान केला.
भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादजी यांनी औरंगाबादला १ सप्टेंबर १९५१ रोजी भेट दिली. त्यावेळेस माननीय राष्ट्रपतींनी एकनाथ संशोधन मंदिरास भेट दिली. राष्ट्रपतींनी उपक्रमाचे मोठे कौतुक केले आणि आपल्या अक्षरात संस्थेस आशीर्वाद लिहून उपकृत केले.
संस्थेच्या सभागृहाचे उदघाटन दिनांक ६ एप्रिल १९५८ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री. श्रीप्रकाशजी यांच्या हस्ते झाले. एकनाथ संशोधन मंदिराच्या कार्याचे कौतुक करण्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण तसेच त्यानंतरचे मुख्यमंत्री नामदार श्री वसंतरावजी नाईक यांनी एकनाथ संशोधन मंदिराला भेट देऊन कार्याचे कौतुक केले तत्कालीन शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांनीही एकनाथ संशोधन मंदिराला भेट देऊन कामाचा गौरव केला.