१. पार्श्वभूमी
बळवंतराव घाटे यांचा जन्म १९०२ साली एका सधन जहागीरदार कुटुंबात झाला. गिरिराव अण्णा घाटे जहागीरदार त्यांचे वडील. गिरिराव मूळचे यावली या गावचे जहागीरदार. परंतु शिक्षणासाठी गुलबर्गा शहरी आले आणि तेथेच स्थायिक झाले. गुलबर्गा त्या काळी निजाम राजवटीत असल्याने माध्यमिक आणि उच्च शिक्षण उर्दूत असे. त्यामुळे गिरिरावांचे मराठी बरोबरच संस्कृत आणि उर्दू भाषेवर देखील प्रभुत्व होते. गिरिरावांनी वकिलीची परीक्षा देऊन वकिलीची सनद मिळवली आणि गुलबर्गा सत्र कोर्टात वकिली सुरु केली. त्याकाळी मोजकेच हिंदू वकील असत. त्यात गिरिरावांची एक अग्रेसर वकील म्हणून ख्याती होती. गुलबर्ग्यात राहून देखील गिरिरावांचा यावली गावाशी कायमचा संबंध राहिला. निवृत्तीनंतर गिरिरावांनी यावलीस परत जाणे पसंत केले.
अध्यात्मिक वारसा
घाटे घराण्याला वारकरी संप्रदायाचा वारसा मिळाला होता. घाटे घराण्याचे आदिपुरुष ‘आदिनारायण महाराज’, पंढरपूरच्या विठ्ठलाचे भक्त होते. महाराजांना स्वर्गीय गायनाचा कंठ लाभला होता आणि बाल वयातच त्यांनी कविता करण्यास प्रारंभ केला. वयात आल्यानंतर त्यांचा यथायोग्य विवाह करण्यात आला. त्यातून त्यांना पुत्रप्राप्ती झाली. परंतु विठ्ठल भक्ती पुढे त्यांचे संसारात मन रमेना. आपले राहते गाव सोडून त्यांनी माहूरगडी श्रीदेवीच्या सेवेस प्रस्थान केले. पुढे पंढरपूर, आळंदी, देहू, जेजुरी, तुळजापूर, अशा अनेक ठिकाणी कीर्तन करत प्रवास केला. दक्षिणेत श्रीरंगपट्टणम येथे आले असताना महाराजांची कीर्ती ऐकून त्यांना तत्कालीन सुलतानाच्या दरबारी पाचारण करण्यात आले. त्यांच्या विचारांनी भारावून त्यांना सात गावांची जहागिरी बहाल करण्यात आली. त्यापैकी यावली या गावी महाराज स्थायिक झाले. त्याठिकाणी विठ्ठल मंदिराची स्थापना करून अखेर तेथेच विठ्ठलाच्या पायी विलीन झाले.
गिरिरावांनी घराण्यातून आलेला वारकरी संप्रदायाचा पायंडा चालू ठेवला. गिरिराव मूळचे अतिशय हुशार. त्यांचे पाठांतर लहानपणापासून खूप चांगले होते. वारकरी वाङ्मयाचा गिरिरावांनी खोलवर अभ्यास केला. संत वाङ्मयावर गिरिराव अस्खलित व्याख्याने देत. पुण्यातील वसंत व्याख्यानमाला त्याकाळी प्रसिद्ध होती. न्यायमूर्ती रानड्यांनी वसंत व्याख्यानमालेची सुरुवात १८७५ साली केली. तेंव्हापासून अव्याहत चालू असलेली ही मालिका पुण्याचे एक भूषण होती. या व्याख्यानमालेत एखादा विषय निवडला जाई. प्रथम काही उप वक्त्यांची विषयावर भाषणे होत व त्यानंतर एक प्रमुख वक्ता व्याख्यान देत असे. गिरिरावांनी अनेकदा उपवक्ते म्हणून भाषणे तर केलीच, परंतु तुकाराम महाराजांवर त्यांनी प्रमुख वक्ता म्हणून दिलेले व्याख्यान फारच गाजले होते. गिरिरावांमुळे गुलबर्ग्याचे नाव पुणे-मुंबईच्या प्रतिष्ठितांच्या तोंडी येऊ लागले.
सामाजिक जाणीव
१९०० सालच्या सुरुवातीचा तो काळ. देशावर ब्रिटिशांचे राज्य होते. यावली गाव सोलापूर जिल्ह्यात. सोलापूर जिल्हा ब्रिटिश साम्राज्यात होता. परंतु गुलबर्गा मात्र निजाम संस्थानाचा भाग होता. मराठवाडा, तेलंगणा आणि उत्तर कर्नाटक या प्रदेशावर निजाम घराणे राज्य करत होते. राज्यात हिंदू लोकसंख्या जरी ८६% असली तरी सरकार दरबारी नोकरीवर केवळ १७% हिंदू होते. बाकी सर्व मुसलमान. त्यातही सचिव, विभाग प्रमुख, सुभेदार, जिल्हाधिकारी, उच्च न्यायालयाचे न्यायाधीश, कनिष्ठ न्यायाधीश, पोलीस अधिकारी या सर्वांत बहुतेक जागांवर मुसलमानच असत. जनतेला राज्यकारभारात भाग घेण्याचा अधिकार नव्हता. सामान्य नागरी हक्कही नव्हते. धार्मिक स्वातंत्र्यही अबाधितपणे उपभोगता येत नसे. नागरी स्वातंत्र्य यावर अनेक बंधने घालण्यात आली होती.
पुणे-मुंबई भागात समाज परिवर्तनाचे वारे वाहात होते. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांच्यासारख्या विचारवंतांच्या मार्गदर्शनाखाली समाजात शैक्षणिक आणि सामाजिक बदल घडून येत होते. १८८० ते १८८६ च्या काळात पुण्यामध्ये ‘न्यू इंग्लिश स्कूल’, ‘नूतन मराठी विद्यालय’, ‘हुजूरपागा कन्या विद्यालय’ यासारख्या स्वदेशी विचारांवर चालणाऱ्या शाळा सुरु झाल्या होत्या. तरुण मनात शिक्षणाचं बीज पेरण्याचं महत्वाचं कार्य या शाळा करीत होत्या.
साहजिकच या परिस्थितीचा परिणाम गिरिरावांच्या विचारावर झाला. न्या. केशवराव कोरटकर, श्री. विठ्ठलराव देऊळगावकर यांसारख्या समविचारी सहकाऱ्यांसोबत शिक्षण प्रसाराची स्वप्ने गिरिरावांनी पहिली. १९०७ मध्ये श्री. विठ्ठलराव देऊळगावकर यांच्या पुढाकाराने गुलबर्ग्यात ‘नूतन विद्यालयाची’ स्थापना केली गेली. त्यात गिरिरावांचा महत्वाचा सहभाग होता. गिरिरावांची संस्थेच्या सचिवपदी निवड झाली. समाज आणि देश घडवण्यासाठी लागणारी एक सक्षम पिढी नूतन विद्यालयाने निर्माण केली.