५. व्यक्तिमत्व आणि विचार 

‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ हा बळवंतरावांच्या  जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांच्या जीवनात 'विचार आणि आचार' यांचा सुंदर संगम होता. उच्च पदस्थ अधिकारी असूनही त्यांना कधीही गर्व नव्हता. 'विद्या विनयन शोभते' या वाक्याचा यथार्थ त्यांच्या कडून  शिकण्यासारखा होता. बळवंतरावांना कोणतेही व्यसन नव्हते. मद्य तर सोडाच, आयुष्यभर साधा चहा देखील बळवंतरावांनी घेतला नाही.  अंतःकरणात ईश्वरभक्ती आणि समाजसेवा ओसंडून भरली होती. बळवंतरावांचे संपूर्ण आयुष्य सात्विकतेने आणि भूतदयेने भरले होते. 

निस्पृहता 

निरनिराळ्या प्रकारच्या सामाजिक कार्यात सहभागी होताना अनेक प्रकारची माणसे बळवंतरावांच्या संपर्कात येत असत. पण अशा संपर्कामुळे अण्णासाहेबांच्या न्यायदानाच्या कामावर आणि त्यांच्या निःपक्षपातीपणावर कधीही परिणाम झाला नाही. त्यांच्या कामात कोणासही ढवळाढवळ करण्याची हिंमत होत नसे. सर्वांना त्यांच्याविषयी आदर आणि प्रेमाबरोबर वचक पण होता. बळवंतराव यांच्या निर्भीडपणे दिलेल्या निवाड्यांची वाखाणणी त्यांचे सहकारी आणि जनता कायम करत. 

बऱ्याचदा न्यायदान करणारी व्यक्ती विद्वान व अभ्यासू असली तरी आत्मबल आणि आत्मविश्वासाच्या अभावी कठीण कामे टाळण्याची त्यांची प्रवृत्ती असते. आपल्या निकालामुळे काही शंका कुशंका तर निर्माण होणार नाहीत ना? असा संभ्रम निर्माण होतो. अशावेळेस सुस्पष्ट निकाल न देता दोन्ही बाजूंना खुश ठेवण्याची प्रवृत्ती न्यायाधीशांना असते. बळवंतराव या सर्वांपासून दूर होते. अभ्यासू वृत्ती बरोबर आत्मविश्वास आणि निर्भीडता याची जोड बळवंतरावांच्या व्यक्तिमत्वात होती. त्यामुळे लोक काय म्हणतील यापेक्षा काय योग्य आहे याचा विचार बळवंतराव प्रथम करत.

अध्यात्म 

बळवंतरावांचा हिंदू धर्माच्या शिकवणीवर दृढ विश्वास होता. वारकरी पंथातील संत वाङ्मयावर बळवंतराव यांचे नितांत प्रेम होते. अण्णासाहेब यांनी कार्तिकी एकादशीची पंढरपूर वारी कधीही चुकवली नाही. पंढरपूर आणि पैठण या तीर्थक्षेत्री त्यांचे नित्याचे येणे असे. बळवंतराव धार्मिक होते देवावर अपार श्रद्धा होती पण ते कर्मठ नव्हते. अनिष्ट रूढी परंपरा, जातीभेद यापासून ते खूप दूर होते. 

सामाजिक बांधिलकी 

निजाम राज्यात नोकरी करत असताना बळवंतरावांनी सामाजिक बांधिलकी जपली.   ज्या समाजाने आपल्याला सारे काही दिले आहे त्या समाजासाठी आपण देणे लागतो याची जाणीव बळवंतरावांना सतत होत असे. समाजात त्यांचे व्यवहार आणि इतरांबरोबर वागणूक अतिशय प्रेमळ आणि कनवाळू होती.

१९४२-४३ मध्ये कुष्टगी, जिल्हा रायचूर येथे मुन्सिफ होते. त्यावर्षी रायचूर भागात प्रचंड दुष्काळ पडला होता. पाऊस न पडल्याने पिके हातची गेली. त्यामुळे अनेक गरीब लोकांची अत्यंत दैनावस्था झाली होती. गरीब लोकांची भूक आणि हाल बळवंतरावांना पाहावले गेले नाहीत. बळवंतरावांनी त्यावेळेस कुष्टगी तालुक्यात तीन-चार ठिकाणी अन्नछत्रे सुरु केली. धनिक लोकांकडून धान्य स्वरूपात आणि पैशाच्या रूपात देणगी गोळा केली आणि जवळजवळ १५०० लोकांना त्या अन्नछत्रालयामध्ये दुपारी १२ ते २ या दरम्यान जेवणाची व्यवस्था केली. हा उपक्रम अनेक महिने दुष्काळ संपेपर्यंत चालू होता. यात सरकारी अधिकाऱ्यांनी आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. हा उपक्रम राष्ट्रीय काँग्रेसच्या स्वयंसेवकांना मदत करण्यासाठी सुरु केला आहे असा ओरडा केला. त्याकाळी हैद्राबाद संस्थानात काँग्रेसवर बंदी होती. परंतु या साऱ्या धमक्यांना बळी न पडता बळवंतरावांनी उपक्रम चालू ठेवला. बळवंतरावांच्या या कार्याची आठवण त्या भागातील मंडळी अत्यंत आदराने आणि कृतज्ञतापूर्वक करत असत.  

बळवंतराव पैठण मध्ये मुन्सिफ म्हणून असतानाची गोष्ट. बळवंतराव आणि त्यांचे काही सहकारी नाथांच्या दर्शनाला निघाले. रस्त्यात एका झाडाखाली एक अनाथ प्रेत पडलेले बळवंतरावांना दिसले. प्रेताचा नुसता हाडांचा सापळा शिल्लक राहिला होता. पशुपक्ष्यांनी आपला वाटा उचलून ते मृत शरीर हलके केले होते. बळवंतरावांनी त्यांचे सहकारी कडेपूरकर यांना खुणावले. पुढचा मागचा विचार न करता दोघांनी ते प्रेम उचलले. जवळच दक्षिणगंगा वाहत होती त्यात नेऊन प्रेताचे विसर्जन केले. गंगा मातेला ते प्रेत अर्पण करून दोघांनी अंगावरच्या कपड्यानिशी गंगेत स्नान केले.  ओल्या कपड्याने दोघेजण बळवंतरावांच्या घरी आले. घरी आल्यावर दोघांनी पुन्हा अंघोळ करून कोरडे कपडे चढवले. ‘जे जे भेटे भूत । ते माने भगवंत।।’ या ज्ञानेश्वरांच्या मंत्राचा साक्षात्कार बळवंतरावांनी करून दाखवला. 

बळवंतराव ज्या गावी बदलीने जात तेथील समाजासाठी जरूर काहीतरी करत. पैठण मध्ये असताना एकनाथ महाराज मंदिराच्या दुरुस्तीचे काम बळवंतरावांनी हाती घेतले.  मंदिराच्या ओवऱ्याची दुरुस्ती करून घेतली. पत्रे टाकून घेतले.  फरशी बसवली. मंदिराची देखील डागडुजी करून घेतली.  बळवंतराव जेव्हा बोध येथे बदलीने गेले तेव्हा त्यांनी बोध येथे एका धर्मशाळेची स्थापना केली. या बांधकामाला लागणारा निधी त्यांनी स्वतः फिरून आसपासच्या धनीकांकडून २५,०००  ते ३०,००० हजार रुपये गोळा केले आणि काम पूर्ण केले.  

बळवंतराव मुन्सिफ असतांना आणि नंतर हैद्राबाद सिविल कोर्टाचे मुख्य न्यायाधीश असताना बराच काळ त्यांच्याकडे स्वतःची मोटार होती. ते आपल्या मोटारीने रोज न्यायालयात जात. परंतु दररोज जाताना आणि परत येताना आपल्या सहकार्यांना बरोबर घेऊन जात. सर्व सहकार्यांना आपापल्या घरी पोहोचवून मगच बळवंतरावांची मोटार स्वघरात परत येई. एखादा सहकारी आजारी असेल आणि कामावर आला नाही तर न्यायालयातून परत घरी जाताना त्याच्या घरी जाऊन त्याची विचारपूस करत. एखाद्या सहकार्याच्या घरी लहान मोठा समारंभ असेल तर आवर्जून समारंभाला हजेरी लावत. त्यांच्या या माणुसकीपर वागणुकीचा त्यांचे सहकारी वारंवार उल्लेख करत.