३. व्यावसायिक कारकीर्द
वयाच्या चौदाव्या वर्षी गुलबर्ग्याहून बळवंतराव शिक्षणानिमित्त पुण्यास आले. परंतु त्यांची नाळ गुलबर्गा आणि तत्कालीन हैद्राबाद संस्थानाशी निगडित राहिली. म्हणूनच पुण्यात लॉ चे शिक्षण घेण्याअगोदर दोन वर्षे त्यांनी हैद्राबाद येथे शिक्षकाची नोकरी करणे पसंत केले. पुण्याच्या लॉ कॉलेजातून LLB केल्यानंतर देखील परत गुलबर्ग्यात जाण्याचा निर्णय बळवंतरावांनी घेतला.
गुलबर्गा येथे वकिली
१९२५ साली, वयाच्या तेविसाव्या वर्षी बळवंतरावांनी गुलबर्ग्यात ‘जुनिअर वकील’ या नात्याने आपल्या व्यवसायाची कारकीर्द सुरु केली. १९२५ ते १९२८ अशी तीन वर्षे बळवंतरावांनी गुलबर्ग्यातील अनगरकर वकील आणि बेळुगिकर वकिलांकडे मदतनीस वकील म्हणून काम केले. श्री. नाझरीयाजंग वकिलांकडे देखील काही दिवस बळवंतराव यांनी अनुभव घेतला.
त्या काळी गुलबर्गा हे 'हैद्राबाद संस्थानात' असल्याने कोर्टाचे व्यवहार उर्दूत चालत. परंतु निजाम राज्यातील न्याय व्यवस्था इंग्रजांच्या न्याय व्यवस्थेच्या अनुकरणाने चाले. त्यामुळे हैद्राबाद संस्थानातील वकिलांना वेळोवेळी इंग्रज राज्यातील खटल्यांचा अभ्यास करणे आवश्यक असे. हे खटले समजावून घेण्यासाठी इंग्रजीचा अभ्यास आवश्यक होता. परंतु हैद्राबाद संस्थानात शिकलेल्या वकिलांना इंग्रजीत लिहिलेले खटले समजावून घेणे जड जाई. उर्दूत अनुवाद केलेल्या गॅझेटवर त्यांना विसंबून राहावे लागे.
बाळबांतरावांचे उच्च शिक्षण इंग्रजीत झाले असल्याने त्यांचे इंग्रजीवर कमालीचे प्रभुत्व होते. त्याचबरोबर उर्दू, मराठी आणि कानडी या भाषांवरही त्यांचे प्रभुत्व होते. यामुळे बळवंतरावांना लवकरच व्यवसायावर चांगली पकड आली. बरेच वरिष्ठ वकील हे गिरिरावांचे सहकारी होते, त्यामुळे ते बळवंतरावांना प्रेमाची वागणूक देत. इतकेच नाही तर वरिष्ठ वकील देखील एखाद्या इंग्रजी खटल्याचा अनुवाद उर्दूमध्ये करण्यासाठी बळवंतरावांकडे देत असत.
हंगामी मुन्सिफ
हैद्राबाद संस्थानात सरकारी नोकऱ्यांत क्वचितच हिंदूंना वाव मिळत असे. संस्थानातील ८६% जनता हिंदू होती परंतु सरकारी नोकरीत केवळ १७% हिंदू होते. बाकी सगळा भरणा मुसलमान अधिकाऱ्यांचा असे. त्यातून न्यायव्यवस्थेत तर बहुतांश जज्ज हे मुस्लिम धर्मीय असत.
हैद्राबाद संस्थानात न्यायव्यवस्था तीन स्तरात विभागली होती. प्राथमिक स्तराला ‘जिल्हा न्यायालय’ संबोधले जाई. कोणताही खटला प्रथम ‘जिल्हा न्यायालयात’ दाखल केला जात असे. प्रत्येक जिल्ह्याच्या शहरी असे ‘जिल्हा न्यायालय’ निर्माण केले गेले होते. जिल्हा न्यायालयाच्या वरील स्तरात ‘सत्र न्यायालयाची’ व्यवस्था केली होती. औरंगाबाद, गुलबर्गा, वारंगल आणि हैद्राबाद या प्रांतीय प्रमुख शहरात ही ‘सत्र न्यायालये’ स्थापन केली होती. ज्या पक्षकाराला जिल्हा न्यायालयाचा निर्णय अमान्य असेल त्यास खटला 'सत्र न्यायालयात' दाखल करण्याची मुभा होती. पक्षकाराला 'सत्र न्यायालया'चा निर्णय देखील मान्य नसल्यास त्यास हैद्राबाद येथे ‘अपील कोर्ट’ किंवा ‘हाय कोर्ट’ येथे खटला दाखल करता येत असे. हैद्राबाद संस्थानात ‘हाय कोर्ट’ ही सर्वोच्च न्याय संस्था होती. हाय कोर्टाचा निर्णय मानणे पक्षकाराला अनिवार्य होते. 'हाय कोर्ट' हैदराबाद शहरात स्थित होते.
त्याकाळी जिल्हा न्यायालयात जज्जाची कमतरता असे. काही जिल्हा न्यायालयात एखादाच जज्ज असे. कामाच्या व्यापात हा न्यायाधीश अपुरा पडे. अशा वेळी न्यायदानाला दिरंगाई होत असे आणि पक्षकारांची मोठी गैरसोय होत असे. अशा परिस्थितीत सरकार 'हंगामी जिल्हा न्यायाधीशा'ची नेमणूक करत असे. अशा न्यायाधीशास ‘हंगामी जिल्हा मुन्सिफ’ असे संबोधले जाई.
तेलंगणात संगारेड्डी या जिल्ह्याच्या गावी अशीच एक ‘हंगामी जिल्हा मुन्सिफ’ अशी जागा तयार झाली. बळवंतरावांच्या वकिली कौशल्यांवर प्रभावित होऊन निजाम सरकारने त्यांना ही जागा देऊ केली. त्याकाळी एखाद्या हिंदूची मुन्सिफ पदी नियुक्ती फारच विरळी होती. बळवंतरावांची वकिली चांगली चालू असली तरी यथायोग्य विचार करून बळवंतराव यांनी ‘हंगामी जिल्हा मुन्सिफ’ जागेवर काम करण्याचे मान्य केले. पुढे १९२८ ते १९३१ अशी तीन वर्षे बळवंतरावांनी वेगवेगळ्या जागी ‘हंगामी जिल्हा मुन्सिफ’ म्हणून काम केले.
निजाम राज्यात नोकरी
तीन वर्षे हंगामी मुन्सिफ म्हणून काम केल्यानंतर १९३१ मध्ये बळवंतरावांची कायम स्वरूपी ‘जिल्हा मुन्सिफ’च्या पदी नियुक्ती झाली. मुन्सिफ या नात्याने त्यांची प्रथम नेमणूक १९३१ साली पैठण येथे झाली.
बळवंतरावांची जिल्हा मुन्सिफ ही नियुक्ती बदलीची होती. दर दोन ते चार वर्षांनी बदली होत असे. १९३१ ते १९४८ मध्ये हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन होईपर्यंत १७ वर्षे बळवंतरावांनी हैद्राबाद संस्थानात मुन्सिफ म्हणून काम केले. या काळात त्यांनी पैठण, आदिलाबाद, कळंब, निलंगा, कुष्टगी, अंबड, वारंगल, जालना या शहरांतून काम केले.
बळवंतरावांनी मुन्सिफ पदी अतिशय इमाने इतबारे नोकरी केली. कोणत्याही खटल्याचा खोलवर अभ्यास केल्याशिवाय ते निर्णयापर्यंत येत नसत. खटल्यातील सर्व कागदपत्रांचे प्रत्येक पान ते काळजीपूर्वक वाचत. खटल्याच्या फाईल मध्ये पुरेशी कागदपत्रे नसल्यास वकिलांना त्याप्रमाणे पुरावे आणण्यासाठी भाग पाडत. बळवंतरावांना सकाळी अतिशय लवकर उठण्याची सवय होती. पहाटे चार वाजता उठून प्रथम दोन तास चालू खटल्यांचा अभ्यास करत आणि मगच आपल्या नित्यक्रमाला सुरुवात करत.
हैद्राबाद संस्थानात निजामाचे राज्य होते. निजाम धर्माने मुसलमान होता. सरकारी नोकऱ्या देण्यात हिंदू-मुसलमान असा दुजाभाव केला जात असे. फार कमी हिंदूंना सरकारी नोकऱ्या मिळत. त्यातून वरच्या पदावर नियुक्तीसाठी केवळ मुसलमान नोकरदारांची वर्णी लागत असे. याला बळवंतराव अपवाद नव्हते. त्यांचे न्यायदान अतिशय निःपक्षपाती आणि विना दिरंगाई असूनही केवळ ते हिंदू असल्याने त्यांच्या कामाचे योग्य मोल त्यांना निजाम सरकारने दिले नाही.
त्यातून बळवंतराव सनातनी वृत्तीचे होते. कार्तिकी एकादशीची पंढरपूर वारी त्यांनी कधीच चुकवली नाही. दर वर्षी एक आठवडा सुट्टी घेऊन ते पंढरपूरच्या दर्शनास जात. याचा त्यांच्या मुसलमान वरिष्ठांना राग होता. त्यांची ही सुट्टी मंजूर करण्यास ते आढेवेढे घेत असत. परंतु बळवंतराव यात कोणताही बदल करण्यास तयार नसत. एवढेच नाही तर त्यांनी एका कार्तिकी एकादशीला सुट्टी नाकारली म्हणून पदाचा राजीनामा दिला. शेवटी वरिष्ठांनी घाबरून सुट्टी मंजूर केली.
अर्थात या सर्वाचा जो परिणाम व्हायचा तोच झाला. अतिशय निस्पृह काम करूनही केवळ एक कट्टर हिंदू असल्या कारणाने त्यांना त्यांच्या कार्याचे योग्य मोल मिळाले नाही.
स्वतंत्र भारत
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला. परंतु निजामाने हैद्राबाद संस्थान स्वतंत्र राखण्याचा निर्णय घेतला. परंतु हैद्राबाद राज्यातील जनतेचा दबाव आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारत सरकारने केलेली पोलीस कारवाई याचा परिणाम म्हणून निजामाने १९४८ साली शरणागती पत्करली आणि हैद्राबाद संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले.
काळाप्रमाणे राजकीय आणि सामाजिक परिस्थिती सुधारली. हिंदूंना दिला जाणारा दुजाभाव संपला. सरकारी नोकरीत भरणा आणि बढत्या वैयक्तिक कौशल्यावर दिल्या जाऊ लागल्या. बळवंतरावांच्या कार्याला ओळखून त्यांना १९५० साली हैद्राबाद येथे ‘चीफ सिटी मॅजिस्ट्रेट’ पद देण्यात आले. दोन वर्षे ‘चीफ सिटी मॅजिस्टेट’ म्हणून काम केल्यावर १९५२ साली बळवंतरावांना सिकंदराबाद येथे ‘सेशन जज्ज’ या पदावर बढती देण्यात आली. जो मान बळवंतरावांना यापूर्वीच मिळायला हवा होता तो अखेरीस त्यांना स्वतंत्र भारताच्या हैद्राबाद राज्यात मिळाला.
भाषावार प्रांतरचना
तेलंगण, मराठवाडा व कर्नाटक या तीन भिन्न घटक प्रांत मिळून मुक्त हैद्राबाद राज्यावर निजामी राजवटीचा अंमल होता. १९४८ मध्ये हैद्राबाद संस्थान भारतीय संघराज्यात विसजिर्त झाले. १९५२ मध्ये हैद्राबाद राज्यात पहिले लोकनियुक्त सरकार स्थापन झाले. चार वर्षांनी, १९५६ मध्ये हैद्राबाद राज्याची भाषावार तत्त्वांवर आधारित विभागणी करण्याचे ठरले. त्यानुसार, हैदराबाद राज्यातील तेलंगण भाग आंध्राशी, मराठवाडा महाराष्ट्राशी आणि कन्नड प्रांत कर्नाटकाशी जोडण्याचा प्रस्ताव विधिमंडळाने संमत केला. हैदाबाद प्रांतातील मराठवाड्याचे पाच जिल्हे आणि मुंबई यासह एक मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.
बळवंतरावांचे नोकरीत मन रमत नव्हते. सामाजिक बांधिलकी त्यांना समाज जीवनाकडे खेचत होती. ज्या समाजाने आपल्याला सर्व काही दिले त्याला उतराई होण्याची मनस्वी इच्छा बळवंतरावांच्या मनात बळावत होती. पंढरपूरच्या विठ्ठलाची आणि पैठणच्या एकनाथ महाराजांची भक्ती त्यांना वारकरी वाङ्मयावर भरीव कामगिरी करण्यास उद्युक्त करत होती. बळवंतरावांचे मूळ गाव यावली. आपल्या मुळ गावाचा कायापालट करून घराण्याने दिलेल्या वारश्यास उतराई होण्याची इच्छा बळवंतरावांच्या मनात बळावत होती.
भाषावार प्रांत रचनेप्रमाणे हैद्राबाद राज्याचे विभाजन होत होते. हैद्राबाद राज्यातला मराठी भाषिक प्रांत; मराठवाडा, महाराष्ट्रात विलीन होत होता. बळवंतरावांची बरीचशी व्यावसायिक कारकीर्द मराठवाड्यात गेली होती आणि त्यांचे मराठवाड्यावर निस्सीम प्रेम जडले होते. मराठवाडा महाराष्ट्रात विलीन होणार ही बळवंतरावांच्या दृष्टीने सुखावह बाब असली तरी व्यावसायिक दृष्ट्या त्यांच्यासाठी एक नवी सुरुवात होती. नवे सहकारी, नवी सरकारी यंत्रणा, नवे नियम यांना सामोरे जावे लागणार होते.
बळवंतरावांनी परिस्थितीचा सर्वांगीण विचार केला. व्यावसायिक जीवनाच्या नवीन पर्वाला सामोरे जाण्याची इच्छा त्यांना होत नव्हती. सामाजिक जीवनाकडे त्यांचे मन ओढ घेत होते. नोकरीत राहून डोक्यात असलेले समाजकार्य करणे शक्य नव्हते.
१९५७ साल उजाडले होते. वयाची ५५ वर्षे पूर्ण झाली होती. उर्वरित आयुष्य सामाजिक कार्याला वाहून घेण्याचा निर्णय बळवंतरावांनी घेतला. बळवंतरावांच्या जीवनातील नवीन पर्व सुरु होत होते.