२. बालपण 

बळवंतरावांचा जन्म १९०२ साली जून महिन्यात झाला. गिरिराव घाटे जहागीरदार बळवंतचे वडील तर आई सुभद्राबाई. त्याकाळी गिरिराव आणि त्यांच्या कुटुंबाचे गुलबर्ग्यात वास्तव्य होते. बळवंतराव लहानपणापासून अतिशय हुशार होते. त्यांचे पाठांतर दांडगे होते. शाळेत जाण्याआधीच बळवंतरावांना मनाचे श्लोक, रामरक्षा, मारुती स्तोत्र आणि अनेक प्रार्थना आणि आरत्या तोंडपाठ होत्या. वडील रोज संध्याकाळी नित्याने बळवंतरावांकडून प्रार्थना म्हणून घेत असत. 

नूतन विद्यालय, गुलबर्गा 

साल १९०८. वयाच्या सहाव्या वर्षी गिरिरावांनी बळवंतरावांचा दाखला गुलबर्ग्याच्या ‘नूतन विद्यालयात’ घेतला. पहिली ते सातवी पर्यंतचे बळवंतराव यांचे शिक्षण नूतन विद्यालयात झाले. नूतन विद्यालयातील स्वदेशी वातावरण आणि आत्मीयतेने शिकवणारे शिक्षक याबद्दल बळवंतरावांना  नितांत आदर आणि अभिमान होता. दामोदरपंत बेडेकर, श्रीपादराव हातोळेकर, बापूजी साठे, धारवाडकर, गोखले या सारख्या शिक्षकांचे ऋण बळवंतराव कायम बोलून दाखवत असत. बळवंतराव यांच्या पुढील आयुष्यातील विचारसरणी आणि वागणूक यावर त्यांच्या नूतन विद्यालयातील काळाचा खोलवर प्रभाव होता. त्यावेळी मिडल स्कूलची एक सरकारी परीक्षा असायची. त्या परीक्षेत बळवंतराव उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले. 

त्याकाळी पुण्यामध्ये शिक्षणाचे वेगळेच वातावरण होते. न्यू इंग्लिश स्कूल, नूतन मराठी विद्यालय यासारख्या आदर्श शाळा होत्या. एवढेच नाही तर पुढे जाऊन कॉलेज शिक्षणासाठी डेक्कन कॉलेज, फर्ग्युसन कॉलेज यासारख्या उच्च शिक्षणाच्या सोई देखील होत्या. बळवंतरावांची हुशारी ओळखून आणि त्याच्या पुढील आयुष्याला पोषक या दृष्टीने पुण्याला स्थलांतर करण्याचा निर्णय गिरिरावांनी घेतला. 

हा निर्णय गिरिरावांसाठी सोपा नव्हता. गुलबर्ग्यात गिरिरावांची वकिली जोमात चालू होती. त्यावर पाणी सोडणे आर्थिक दृष्ट्या अवघड होते. त्याकाळी गुलबर्गा निजाम संस्थानात होते तर पुणे इंग्रजांच्या अधिपत्याखाली होते. गिरिरावांची वकिली सनद निजाम राज्यातील होती. त्यायोगे इंग्रजी राज्यात वकिली करण्यास परवानगी नव्हती. पुण्यात स्थलांतर करायचे म्हणजे गिरिरावांना पुण्यात लहान मोठी नोकरी घेणे भाग होते. या सर्वांचा विचार करून देखील गिरिरावांनी पुण्यात स्थलांतराचा विचार पक्का केला तो केवळ बळवंतच्या भावी आयुष्याचा विचार करूनच. 

नूतन मराठी विद्यालय, पुणे 

साल १९१६. गिरिरावांनी बळवंतरावांचा दाखला ‘नूतन मराठी विद्यालयात’ घेतला. नूतन मराठी विद्यालय त्याकाळी एक अतिशय नामवंत शाळा म्हणून प्रसिद्ध होती. शाळेची स्थापना ‘शिक्षण प्रसारक मंडळी’ या संस्थेने १८८३ मध्ये केली होती. नूतन मराठी विद्यालय ही पुण्यातील सर्वांत जुन्या शाळांपैकी एक. ही शाळा विष्णूशास्त्री चिपळूणकर यांच्या स्मरणार्थ १ जानेवारी १८८३ रोजी स्थापन करण्यात आली. सर्वांना चांगले व परवडणार्‍या दरात शिक्षण मिळावे, या हेतूने चिपळूणकरांनी न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली होती. चिपळूणकरांचे १८८२ ला निधन झाले. ही शाळा त्यांचे स्मारकच आहे, असे समजले जाते. शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलेल्या कृष्णाजी बल्लाळ डोंगरे, दामोदर सदाशिव करंबेळकर, कृष्णाजी गोविंद उकिडवे, रामचंद्र गोपाळ देव या चार प्राथमिक शिक्षकांनी ही शाळा स्थापन केली. ब्रिटीश सरकारकडून कुठल्याही प्रकारची मदत न घेता मराठी भाषेतून गुणवत्तापूर्ण शिक्षण देणे हे संस्थेचे उद्दिष्ट होते. या संस्थेच्या प्रगतीमध्ये लोकमान्य टिळक, गोपाळ कृष्ण गोखले, न. चिं. केळकर आणि दत्तो वामन पोतदार यांसारख्या स्वातंत्र्य चळवळीतील प्रमुख नेत्यांचे मोलाचे योगदान होते.

बळवंतरावांनी आठवी ते दहावी पुणे येथे नूतन मराठी विद्यालयातून शिक्षण पूर्ण करून ते अव्वल दर्जात मॅट्रिक झाले. नूतन मराठी विद्यालयाचा आदर्श कायम बळवंतरावांच्या समोर राहिला. येथेही सहाध्यायी आणि गुरुजनांवर आपल्या व्यासंगी वृत्तीने व सालस स्वभावाने बळवंतरावांनी  आपली छाप पडली. 

फर्ग्युसन कॉलेज, पुणे  

देशाच्या इतिहासात फर्ग्युसन कॉलेजला अतिशय महत्वाचे स्थान आहे. हे महाविद्यालय ‘डेक्कन एजुकेशन सोसायटी’ या संस्थेचे असून त्याची स्थापना १८८५ साली विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, गोपाळ आगरकर यांच्या पुढाकाराने झाली. त्याकाळात कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक तरुणासाठी फर्ग्युसन कॉलेज हे एक प्रेरणा स्थान असे. 

BA करण्यासाठी बळवंतरावांनी १९१८ साली प्रवेश घेतला. १९१८ ते १९२२ ही चार वर्षे फर्ग्युसन कॉलेज मध्ये शिकून त्यांनी BA पदवी संपादन केली. या काळात त्यांनी केलेले मित्र पुढील आयुष्यात त्यांचे कायमचे सोबती राहिले. श्री. विठ्ठलराव कोरटकर आणि श्री. भीमसेनराव कुंद्रीमोती या मित्रांची नावे येथे आवर्जून घेता येतील. दोघेही पुढे जाऊन बळवंतरावांचे व्याही झाले. 

अर्थात BA डिग्री घेऊन बळवंतरावांचे समाधान झाले नव्हते. वडील गिरिरावांची इच्छा त्यांनी वकिली शिकावी अशी होती. बळवंतराव यांना देखील वकिलीची परीक्षा देण्यात रस होता. त्याकाळी पुण्यात लॉ कॉलेज नव्हते. पुढील शिक्षणाच्या खर्चाचा  विचार डोक्यात ठेवूनच त्यांनी हैद्राबादच्या विवेक वर्धिनी शाळेमध्ये नोकरी पत्करली. बळवंतरावांनी हैद्राबादच्या विवेक वर्धिनी शाळेमध्ये २ वर्षे नोकरी केली. 

लॉ कॉलेज, पुणे 

त्याच सुमारास १९२४ साली पुण्यामध्ये इंडियन लॉ सोसायटीच्या  लॉ कॉलेज ची स्थापना झाली. या कॉलेजमधून LLB करण्याची पूर्तता करण्यात आली. विवेक वर्धिनी मध्ये शिक्षक पेशा पत्करलेल्या बळवंतरावांना याची बातमी मिळाली. ताबडतोब शाळेत राजीनामा देऊन बळवंतराव पुण्यात आले. नवीन सुरु झालेल्या कॉलेजशी संपर्क साधून ताबडतोब दाखला करून घेतला. अशा रीतीने इंडियन लॉ सोसायटीच्या पुणे येथील लॉ कॉलेजचे ते पहिले विद्यार्थी ठरले. 

१९२४-२५ या दोन वर्षांत वकीलीचा अभ्यास करून बळवंतरावांनी अव्व्ल दर्जात LLB पूर्ण केले.