८. यावली
यावली हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील लहानसे गाव. घाटे घराण्याचे हे मूळ गाव. घाटे घराण्याचे आद्य पुरुष, आदिनारायण महाराज यांना हे गाव जहागीर मिळाले. आदिनारायण महाराज त्यांच्या उत्तर काळात येथेच येऊन स्थायिक झाले आणि अखेर येथेच विठ्ठलाच्या पायी विलीन झाले. अण्णासाहेबांचे वडील गिरिराव आण्णा घाटे जहागीरदार शिक्षणासाठी गुलबर्गा येथे गेले आणि तेथेच स्थायिक झाले. परंतु गिरिरावांची नाळ कायम यावालीशी जोडलेली राहिली. त्यांच्या उत्तर आयुष्यात त्यांनी यावलीस परत येणे पसंत केले.
अण्णासाहेबांचे शिक्षण गुलबर्गा आणि पुणे येथे झाले. त्यानंतर मुन्सिफ म्हणून बदलीच्या नोकरीत असल्याने मराठवाडा आणि तेलंगणा या भागात त्यांची कारकीर्द झाली. परंतु अण्णासाहेबांचे यावलीशी संबंध कायम होते. लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्यात अण्णासाहेब यावलीस येत. व्यवसायात असताना सुद्धा मुद्दाम सुटी काढून वर्षातून दोन तीन वेळा ते यावलीस येत. १९५७ मध्ये अण्णासाहेबांनी सेवा निवृत्ती घेतल्यानंतर त्यांचे यावलीशी ऋणानुबंध वाढले. यावली गावाला आलेली मरगळ त्यांना खुपत होती. यावलीचा कायापालट करून यावली गावात चेतना निर्माण करण्याचा ध्यास अण्णासाहेबांनी घेतला.
१९५७ चा तो काळ. यावली म्हणजे इनामी गाव. गावात मुख्यत्वे मराठा कुटुंबांची वस्ती. ब्राह्मणांचे दहा ते बारा वाडे, एका बाजूला महारवाडा. वेशीच्या लगत मुलानी आणि बागवान यांची वस्ती वरच्या अंगाला तीन चार लिंगायत कुटुंबे. इतरत्र सुतार, कोळी, कुणबी, लोहार, दुकानदार, जंगम असे अठरापगड जातींना पोटात घेऊन यावली गाव जगत होते. गावाला निरनिराळ्या देवांचे आशीर्वाद लाभले होते. उत्तरेकडे चांग पीर आणि बिरोबा, समोर मारुतीचे देऊळ, गावाच्या उत्तरेला विठ्ठल मंदिर, पश्चिमेला म्हाळसाई आणि दक्षिणेला आदी पुरुष आदिनारायण महाराजांची समाधी. याशिवाय गावात मठ आणि लहान मोठ्या मूर्ती.
प्रभात फेरी
अण्णासाहेब जसे गावात आले तसे त्यांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. गावात जशा थोड्या मोठ्या सुधारणा होऊ लागल्या तसे लोक हळूहळू व्यसनाधीन होत चालले होते. दिवसभर रिकामटेकडी माणसे इतरांच्या कुचेष्टा करत किंवा कुणाला सतावीत रस्त्यावर उभे राहत असत. तालमीत जाणे, भजन प्रवचनाला जाणे किंवा मठातल्या पोथीला जाणे कमी होताना दिसत होते. हे सारे पाहून अण्णासाहेबांचे मन उद्विग्न झाले. यावर उपाय करणे आवश्यक आहे हे अण्णासाहेबांच्या लक्षात आले.
एक दिवस अण्णासाहेब यांनी प्रेमातल्या दहा वीस माणसांना संध्याकाळी ओसरीवर बोलावले. साऱ्यांना उद्देशून अण्णासाहेब म्हणाले,
“हरी नामाच्या गजराने आपण सकाळ सुरू केली पाहिजे. यावलीत उद्यापासून आपण प्रभात फेरी सुरू करू या.”
थोडेफार समजावून सांगितल्यानंतर गावकऱ्यांनी अण्णासाहेबांची सूचना मान्य केली. दुसऱ्याच दिवशीपासून यावली गावात प्रभात फेरी सुरू झाली. भल्या पहाटे पाच वाजता हातात कंदील घेऊन वीस पंचवीस मंडळी मारुती मंदिराच्या पारापासून निघाली. “प्रभाते मनी राम चिंतीत जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा” आणि “श्रीराम जय राम जय जय राम” असा जयघोष करत मंडळी खालच्या आळीकडून वरच्या आळीला वळसा घालून विठ्ठल मंदिराकडे गेली.
पहाटेच्या त्या अनपेक्षित आवाजाने अनेक मंडळी रस्त्यावर आली. कोणी कौतुकाने, कोणी भक्तिभावाने तर कुणी कुत्सितपणे त्या फेरीचे स्वागत करीत होते. दुसरा दिवस उजाडल्यावर पुन्हा फेरी निघाली. काही घरासमोर सडे शिंपले होते तर काही घरासमोर समया लावल्या होत्या. जणू दिवाळी कायमचीच वस्तीला आली होती. या प्रभात फेरीचे सभासद पुढे वाढत गेले आणि मग ही फेरी पंचवीस वर्षे कधीही न थांबता चालू राहिली.
गावातील वातावरण पाहता पाहता बदलले. गावात दारूबंदी आली. टवाळक्या आणि गुंडगिरी नाममात्र शिल्लक राहिली. गावाचे वातावरण अतिशय शुद्ध आणि धार्मिक झाले.
गावाला वीज
यावली गावात काय पण पंचक्रोशीत अजून वीज आली नव्हती. संध्याकाळ झाली आणि अंधार पडला की घराघरांतून तेलाचे मिणमिणते दिवे लागत. दिवसभर शेतात राबून आलेला शेतकरी त्या लहानशा प्रकशात जेमतेम जेवण करी आणि झोपी जाई. मग काही वाचन, संवाद, चर्चा, विकास याला कोणता वाव?
ग्रामपंचायतीतील काही माणसे अण्णासाहेबांना भेटायला आली. कोणीतरी माहिती आणली होती. पाच दहा मैलावर विजेचे खांब बांधले जात होते. परंतु गावात वीज केंव्हा येईल याचा सरकार दरबारीही ठाव ठिकाणा नव्हता. गावकऱ्यांनी अण्णासाहेबांना प्रयत्न करायची विनंती केली. अण्णासाहेबांना विचार पसंत पडला. अण्णासाहेबांचे थोरले चिरंजीव प्रभाकरराव वीज बोर्डात मोठ्या हुद्यावर होते. अण्णासाहेबांनी चिरंजीवांना संदेश पाठवला. अण्णासाहेबांचा संदेश म्हणजे प्रभाकररावांना आदेश होता. त्यांनी मुंबईत हालचाली केल्या. आणि पाहता पाहता गावात विजेचे खांब आले, तारा आल्या आणि एका सुदिनी यावली विजेने उजळून निघाली. कुठे वाच्यता नाही, कुठे गवगवा नाही.
समाज मंदिर
वेशीतून आत शिरल्यावर डावीकडे पडझड झालेली चावडीची इमारत होती. एका कोपऱ्यात 'प्राथमिक शाळा' अशी एक केविलवाणी पाटी होती. हे सारे पाहून अण्णासाहेब कष्टी झाले. अण्णासाहेबांनी पंचायतीच्या सभासदांना बोलावले. त्या वास्तूत एक समाज मंदिर बांधण्याची कल्पना त्यांनी सभासदांसमोर मांडली. समाज मंदिरात चावडीसाठी जागा, लोकांना बसून चर्चा करण्यासाठी सभागृह, एक वाचनालय, प्राथमिक शाळा, दवाखाना, डाकघर अशा लोकोपयोगी सुविधा असाव्यात. अण्णासाहेबांनी सरकार कडून प्रस्ताव मंजूर करून घेऊन सरकारी निधी मिळवावा असा सल्ला दिला.
पंचायतीने ताबडतोब सल्ला मान्य करून प्रस्ताव सरकारी कार्यालयात वर पाठवला. त्याकाळी सरकारी योजनांचे प्रवाह खेड्याकडे येताना वाटेतच अटत असत. अर्ज विनंती यांचे कागद मामलेदार, कलेक्टर यांच्याकडे जात. परंतु त्यावर सहसा उत्तर येत नसे. या अर्जाबाबत तेच झाले. यात अनेक दिवस निघून गेले. प्रस्ताव होता तिथेच राहिला.
एखादा ध्यास घेतला की त्या कामाची तड लावायची असा चंग बांधणाऱ्या माणसांस नेहमीच रस्ते सापडतात. सरकारी निधी मिळत नसेल तर निधी गोळा करून किंवा स्वखर्चाने समाज मंदिर बांधण्याचा निश्चय अण्णासाहेबांनी केला. अण्णासाहेबांचे दुसरे चिरंजीव विठ्ठलराव यांनी मुंबई येथे नवीन व्यवसाय सुरू केला होता. अण्णासाहेबांनी विठ्ठलरावांना समाज मंदिराच्या प्रकल्पाची माहिती दिली. सरकारी निधी येत नसल्याने स्वखर्चाने हा प्रकल्प पूर्ण करण्याचा मानस त्यांनी विठ्ठलरावांसमोर व्यक्त केला. अण्णासाहेबांची दांडगी इच्छा पाहून विठ्ठलरावांनी प्रस्तावावर काम करण्यास ताबडतोब तयारी दाखवली. बांधकामास लागणारे साहित्य आणि निधी याची विठ्ठलरावांनी ताबडतोब यावली येथे रवानगी केली.
१९८१ चा सुमार. कामाला सुरुवात झाली. पडक्या चावडीच्या जागेवर एक सुंदर समाज मंदिर उभे राहिले. उद्घाटन समारंभास स्वतः जिल्हाधिकारी आणि त्याकाळचे त्या भागातील मान्यवर पुढारी श्री तुळशीदास जाधव आले होते. गाववेशीवर तोरणे बांधली होती. गावाला खरा सण साजरा झाल्यासारखा वाटत होता. गावाचे पडकेपण गेले होते. वेशीतून आत आल्यावर डाव्या हाताला दिमाखदार, गावाच्या हक्काचे समाज मंदिर उभे झाले होते.
विठ्ठल मंदिर
गावाच्या उत्तरेकडे एक विठ्ठलाचे अप्रतिम मंदिर आहे. घडीव दगडाची ती इमारत अतिशय सुबक आणि रेखीव आहे. परंतु काळाच्या ओघात त्या मंदिराची निगा राखली जात नव्हती. पाखरे कावळे मंदिरावर बसायची आणि त्यांनी टाकलेल्या बियातून पिंपळाची रोपे उगवली. पिंपळाची रोपे वाढत गेली आणि त्याच्या मुळ्या वर पासून खाली उतरल्या. पाहता पाहता त्या सुंदर मंदिराला दृष्ट लागली आणि चोहोबाजूंने पडझड होण्याची वेळ आली. गावातील बरीच माणसे दररोज पूजेला जात. समोरच्या अंगणात झाडझूड चाले. परंतु मंदिराची दुर्दशा थांबवण्याची इच्छा कोणी दाखवायला तयार नव्हते. पुन्हा अण्णासाहेबांच्या रूपाने ही जबाबदारी घेणारा माणूस पुढे आला.
१९८५ चा सुमार. मंदिराची पुनःउभारणी हे भरपूर खर्चाचे काम होते. शेतीतून येणाऱ्या सर्व उत्पन्नातून हा खर्च करावयाचा संकल्प अण्णासाहेबांनी सोडला. प्रचंड आकाराचे घडीव दगड. ते उतरवून घेण्यासाठी साधने आणली. विठ्ठलभक्त गवंडी आणि इतर मंडळी पोटापुरते दाम घेऊन कामात दंग झाली. प्रत्येक दगड उतरवताना त्या दगडावर त्याच्या जागेचा क्रमांक मांडण्यात आला. झाडाची मुळे वेगळी केल्यानंतर प्रत्येक दगड जागच्याजागी लावला गेला. मंदिराची पुनर उभारणी सुरू झाली. पाहता पाहता मंदिर पूर्वीच्या दिमाखाने उभे राहिले. जीर्णोद्धाराचा सुंदर समारंभ झाला. मंदिरासमोर प्रशस्त सभामंडप उभा करण्यात आला.
मंदिरात दररोज रात्री भजन, कीर्तन, वाचन आजही चालते.