४. संसार  

१९२९ मध्ये बळवंतरावांचे दोनाचे चार हात झाले. बळवंतराव यांचा विवाह दमयंतीबाईंशी झाला. दमयंती बाई चिंचोळी गावच्या देशमुखांच्या द्वितीय कन्या. ५ जानेवारी १९३१ रोजी दाम्पत्याला पहिली पुत्रप्राप्ती झाली. मुलाचे नाव प्रभाकर ठेवण्यात आले. पुढे ९ जानेवारी १९३२ साली दुसरा पुत्र जन्माला आला. एकादशीच्या दिवशी जन्माला आला म्हणून त्याचे नाव विठ्ठल ठेवण्यात आले. दाम्पत्याला २५ डिसेंबर १९३५ रोजी तिसरे अपत्य कन्या रत्न झाले. तिचे नाव कुमुदिनी ठेवण्यात आले. बळवंतरावांच्या सुखी कुटुंबाला सुरुवात झाली. 

बळवंतरावांचे पुण्यात शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही वर्षे गुलबर्ग्यात राहून गिरिराव आपल्या मूळ गावी; यावली येथे स्थायिक झाले. बळवंतरावांची नोकरी बदलीची होती. मुलांच्या शिक्षणाची अबाळ होऊ नये यासाठी बळवंतरावांनी बार्शी येथे कुटुंबासाठी कायमची व्यवस्था केली. दमयंती बाई वर्षात सहा महिने बार्शीत मुलांबरोबर असत तर सहा महिने बळवंतरावांबरोबर बदलीच्या गावी राहत. दमयंती बाई बळवंतरावांच्या बदलीच्या गावी जात तेंव्हा बळवंतरावांच्या आई, सुभद्राबाई मुलांसोबत बार्शी मध्ये राहात. मुलांच्या भवितव्यासाठी मोठ्यांनी केलेल्या या त्यागाला तोड नव्हती. 

दमयंतीबाईंच्या मोठ्या बहिणीची दोन मुले, जयश्री आणि प्रकाश. तसेच दमयंतीबाईंच्या भावाची दोन मुले, सुनील आणि हेमा. या भावंडांच्या शिक्षणाची आबाळ होत होती. बार्शी नंतर बळवंतरावांनी कुटुंब औरंगाबादला हलवले. बळवंतरावांनी मोठ्या मनाने जयश्री, प्रकाश, सुनील आणि हेमा यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेऊन घेण्याचा निर्णय घेतला. चारही भावंडे बळवंतरावांच्या कुटुंबात मिसळून गेली. सर्वांना सारखी वागणूक मिळायची.  सर्वांनी सारखे वाटून घ्यायचे,  सारखे कपडे,  सारखी राहणी आणि सारखे शिक्षण. बळवंतरावांनी कधीच भेदभाव केला नाही. 

त्या काळाच्या मानाने बळवंतरावांचे कुटुंब म्हणजे  सुखवस्तू कुटुंब होते. तरी घरात साधी राहणी आणि सामान्य जीवनाची सवय होती. पहाटे उठून आपापली अंथरुणे आवरून पहाटेची प्रार्थना म्हटली पाहिजे हा नियम होता. दिवसभरात व्यायाम किंवा फिरणे यातून कोणालाही सूट नव्हती.  संध्याकाळी सर्वांनी एकत्र बसून प्रार्थना म्हणायची आणि प्रार्थनेनंतर थोरांना वाकून नमस्कार करायचा हा अलिखित कार्यक्रम होता.

मुलांच्या शिक्षणाच्या बाबतीत बळवंतरावांचा फार कटाक्ष होता. मुले अभ्यास कसा करतात, शालेय कार्यक्रमात किती सहभागी होतात, शाळेच्या विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे त्यांच्याशी संबंध कसे आहेत यावर बळवंतरावांचे बारीक लक्ष होते. नोकरीच्या निमित्ताने ते बदलीच्या गावी राहात.  परंतु मुलांच्या शिक्षणाचा विचार करून सर्व मुलांना त्यांनी बार्शी येथे ठेवले होते.  जेव्हा रजा मिळेल तेव्हा ते बार्शीला येत. मुलांच्या शिक्षणाची चौकशी करीत. मुलांनी शाळेत होणाऱ्या वक्तृत्व स्पर्धेत भाषणे दिलीच पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे. मुलांना सभाधीटपणा यावा, त्यांनी व्यावसायिक शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र व्हावे असे त्यांना नेहमीच वाटे. 

दोन्ही मुले, प्रभाकर आणि विठ्ठल यांनी इंजिनिअर व्हावे आणि लहान बहीण कुमुद हिने डॉक्टर व्हावे हा बळवंतरावांचा आग्रह! प्रभाकर, विठ्ठल आणि कुमुद तिघेही अण्णासाहेब यांच्या शब्दाबाहेर नव्हते. प्रभाकर राव इलेकट्रीकल इंजिनिअर झाले तर विठ्ठलराव यांनी धातू शास्त्रात डॉक्टरेट केली. कुमुद ताई डॉक्टर झाल्या. 

मोठे चिरंजीव प्रभाकरराव यांचा विवाह अण्णांचे मित्र श्री. विठ्ठलराव कोरटकर यांची कन्या स्नेहलता हिच्याशी झाला. दुसरे चिरंजीव विठ्ठलराव यांचा विवाह प्रसिद्ध उद्योगरत्न श्री. गोपाळराव टोणगावकर यांची कन्या विद्या हिच्याशी झाला तर सर्वात लहान मुलगी डॉ. कुमुदिनी हिचा विवाह अण्णांचे मित्र श्री. भीमसेन राव कुद्रीमोती  यांचे सुपुत्र डॉ. श्रीकांत कुद्रीमोती यांच्याशी झाला. प्रभाकर राव महाराष्ट्र वीज बोर्डात मोठ्या हुद्यावर पोहोचले. विठ्ठलरावांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. डॉ. कुमुदिनी यांनी स्वतःचा वैद्यकीय व्यवसाय सुरु केला.

अण्णासाहेबांच्या यशस्वी जीवनात त्यांच्या पत्नी दमयंतीबाई यांचे फार मोठे योगदान आहे.  अण्णासाहेबांच्या  प्रचंड व्यापात आणि विस्तीर्ण जीवनात दीपस्तंभासारख्या  दमयंती बाई त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यांच्या प्रत्येक कार्यात स्वतःला मनःपूर्वक झोकून देऊन शांतपणे संसाराचे इतर सारे उपचार सांभाळणाऱ्या दमयंतीबाई यांचा बळवंतरावांना फार मोठा आधार ठरला.  बळवंतरावांचे गृहस्थ जीवन हे कुटुंबा पुरते कधीच राहिले नाही आणि दमयंतीबाईंच्यामुळेच ते सहज साध्य झाले.