७. बाल ज्ञान मंदिर
अण्णासाहेबांच्या प्रेरणेने अण्णासाहेबांच्या पत्नी सौ. दमयंतीबाई घाटे यांनी १९६२ साली ‘सरला स्नेह मंडळाची’ स्थापना केली. सरला स्नेह मंडळाच्या सौ. दमयंतीबाई घाटे अध्यक्ष होत्या तर श्रीमती सिंधुताई दांडेकर या सेक्रेटरी होत्या.
खडकेश्वर परिसरातील लहान मुलांना शाळेत जाण्याकरिता वाहनव्यवस्थेच्या समस्येला तोंड द्यावे लागत होते. यामुळे सरला स्नेह मंडळाला अण्णासाहेबांनी लहान मुलांकरिता शाळा काढण्यास प्रोत्साहन दिले. यातूनच ‘बाल ज्ञान मंदिर’ या शाळेची सुरुवात झाली. अण्णासाहेबांनी शाळा एकनाथ मंदिराच्या वास्तूतच भरवण्यास परवानगी दिली
पुढे शाळेने शासकीय अनुदान स्वीकारण्याचा निर्णय घेतला तेव्हा पुन्हा जागेचा प्रश्न आडवा आला. ती जागा कमी भासू लागली तेव्हाही अण्णासाहेबांनी शाळा चालकांना मार्ग दाखविला. श्री एकनाथ संशोधन मंदिराच्या विश्वस्त मंडळाशी चर्चा करून अवघड वाटणारा प्रश्न सोपा करून दाखविला. बाल ज्ञान मंदिराला त्यांच्या सोयीने वास्तु बांधावयास एकनाथ संशोधन मंडळाने परवानगी दिली. शाळा पुढे वाढत गेली आणि मॉन्टेसरी ते आठवी पर्यंत ९५० विद्यार्थी ज्ञानार्जन करू लागले.