११. सूर्यास्त
बुधवार, दिनांक २५ ऑक्टोबर १९८९. आदल्या दिवशी रात्री नेहमीप्रमाणे संध्याकाळचे जेवण करून प्रार्थना म्हणून अण्णासाहेब नित्याप्रमाणे झोपी गेले. सहसा अण्णासाहेब सकाळी साडेपाच ते सहा वाजेपर्यंत उठत असत. सात वाजून गेले तरी अण्णासाहेब उठले नाहीत म्हणून अण्णासाहेबांच्या पत्नी दमयंती बाई यांनी हाक मारून उठवण्याचा प्रयत्न केला. परंतु अण्णासाहेब काही उठले नाहीत. दमयंती बाई यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. बाजूलाच अण्णासाहेबांच्या कन्या डॉक्टर कुमुदताई यांचे घर आणि इस्पितळ होते. दमयंती बाईंनी इस्पितळातून तुकाराम कंपाऊंडरला हाक मारली. तुकारामने अण्णासाहेबांना उठवण्याचा निष्फळ प्रयत्न केला तेव्हा त्यांनी डॉ. कुमुद ताईंना बोलावणे धाडले.
कुमुदताई हातात स्टेथेस्कोप घेऊन अण्णांच्या खोलीत आल्या. अण्णासाहेब शांत झोपल्यासारखे दिसत होते. कुमुदताईंनी नाडी पाहिली. ती शांत होती. डाव्या कुशीवरून त्यांना सरळ केले आणि हृदयाशी स्टेथेस्कोप लावला. सारे काही शांत होते. हा नश्वर देह टाकून त्यांचा आत्मा अनंतात विलीन झाला होता.
दिनांक २५ ऑक्टोबर १९८९ रोजी ‘अण्णासाहेब’ या महापर्वाचा अंत झाला …