६. एकनाथ संशोधन मंदिर  

व्यवसायातून निवृत्ती घेणे म्हणजे व्यवसायात घ्याव्या लागणाऱ्या जबाबदाऱ्यांना रामराम करून नातवंडांत रममाण होणे आणि राहून गेलेल्या कौटुंबिक आणि इतर सुखांचा आरामात उपभोग घेणे असा निवृत्तीचा सर्वसामान्य अर्थ समाजात लावला जातो. परंतु बळवंतरावांसाठी निवृत्तीचा अर्थ निराळा होता. बळवंतराव यांच्यासाठी  व्यवसायातून निवृत्ती म्हणजे केवळ अर्थार्जन हा प्रमुख उद्देश न ठेवता लोकोपयोगी कामासाठी स्वतःला अर्पण करणे. स्वतःचे व्यक्तित्व घडवण्यात समाजाने जे सर्व काही दिले त्याची अंशतः परतफेड करणे. निवृत्ती पश्चात पुढील काळात बळवंतराव आपल्या या विचारांना खरे जागले. समाजकार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. बळवंतरावांच्या पश्च्यात त्यांची खरी ओळख त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी केलेल्या कामाने होते. 

निवृत्तीनंतर बळवंतरावांना घरी आणि समाजात अण्णा किंवा अण्णासाहेब म्हणून आदराने ओळखले जात असे. १९५२ साली अण्णासाहेबांना सिकंदराबाद येथे ‘सेशन जज्ज’ या पदावर बढती देण्यात आली. सेशन जज्ज म्हणून ५ वर्षे काम केल्यावर १९५७ साली त्यांनी न्यायमूर्ती पदावरून ऐच्छिक निवृत्ती घेतली. निवृत्ती घेण्याअगोदर अण्णासाहेबांच्या पुढील कामाचा आराखडा तयार होता. एवढेच नाही तर त्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. 

संस्थेची स्थापना 

स्वातंत्र्य प्राप्तीच्या सुमारास अहमदनगरच्या ‘वाङ्मयोपासक मंडळाने’ संत शिरोमणी श्री. ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवन कार्य व त्यांची साहित्य संपदा यांचे दर्शन महाराष्ट्रातील जनतेला घडवले. ‘ज्ञानेश्वर दर्शन’ नावाच्या ग्रंथातून ज्ञानेश्वरांचे जन्मस्थान असलेल्या नेवासे येथे तो प्रसिद्ध केला. 

यापासून प्रेरणा घेऊन अण्णासाहेबांनी काही अन्य नाथ भक्तांच्या समवेत संतश्रेष्ठ श्री. एकनाथ महाराजांच्या विपुल ग्रंथ संग्रहाचा परिचय करून देण्याच्या उद्देशाने सन १९४९ मध्ये ‘श्रीनाथ वाङ्मय उपासक मंडळाची’ स्थापना केली. या मंडळानी ‘एकनाथ दर्शन’ हा लेखन संग्रह दोन ते तीन खंडातून प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला. ‘एकनाथ दर्शन’ हा ग्रंथ तयार होऊन १९५२ साली पैठण येथे श्रीनाथांच्या समाधी मंदिरात त्याचे प्रकाशन समारंभ पूर्वक करण्यात आले.

एकनाथ महाराजांच्या वाङ्मयावर काम पुढेही चालू ठेवण्यासाठी १९५१ मध्ये अण्णासाहेबांनी 'श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या' शुभ दिनी 'एकनाथ संशोधन मंदिरा'ची स्थापना केली. औरंगाबाद जिल्ह्याचे तत्कालीन कलेक्टर आणि इतिहास संशोधक श्री.  सेतूमाधवराव पगडी आणि शासकीय कला महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश नागेश थत्ते यांचा सहयोग अण्णासाहेबांना संस्थेच्या  स्थापनेत मिळाला. कार्याचा आरंभ औरंगाबाद येथील खडकेश्वर मंदिराच्या एका खोलीत झाला. संस्थेतर्फे संत वाङ्मय व इतर उपयुक्त पुस्तके सभासदांना उपलब्ध करून देणे, व्याख्याने आयोजित करणे इत्यादी कार्य नेमाने सुरू झाले.

त्याच सुमारास भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्रप्रसादजी यांनी औरंगाबादला १ सप्टेंबर १९५१ रोजी भेट दिली. अण्णासाहेब आणि सेतूमाधव राव यांच्या खास प्रयत्नांनी माननीय राष्ट्रपतींनी संस्थेला यावेळी भेट दिली. राष्ट्रपतींनी उपक्रमाचे मोठे कौतुक केले आणि आपल्या अक्षरात संस्थेस आशीर्वाद लिहून उपकृत केले. तसेच स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही संस्थेच्या कार्याचा गौरव करून शुभेच्छा व्यक्त केल्या. 

संस्थेचे प्रमुख उद्देश खालील प्रमाणे ठरवण्यात आले:

१.  संत वाङ्मयाच्या अभ्यासाला उपयुक्त असा मध्यवर्ती ग्रंथ संग्रह निर्माण करणे

२.  संत वाङ्मयाच्या प्रसारासाठी साहित्य प्रसिद्ध करणे

३.  श्री. एकनाथ व इतर संतांच्या ग्रंथाच्या संशोधित आणि अधिकृत प्रती प्रसिद्ध करणे

४.  संत वाङ्मयासंबंधी विवेचक आणि व्यासंगपूर्ण ग्रंथ प्रसिद्ध करणे

५.  श्री. एकनाथ व इतर संत यांचे व त्यांच्या संबंधित प्रमुख वाङ्मय हिंदी व इतर भाषेत अनुवाद रुपाने प्रसिद्ध करणे

६.  संत वाङ्मय संबंधी विद्वानांची व्याख्याने आयोजित करणे 

७.  संत वाङ्मयाबरोबर इतर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषयासंबंधीच्या संशोधनास उत्तेजन देणे

८.  अशा संशोधनास उपयुक्त ते शिक्षण तरुण कार्यकर्त्यांना देण्याची व्यवस्था करणे

९. संशोधन कार्य वाढीस लागावे या दृष्टीने पारितोषिके व शिष्यवृत्ती यांची योजना करणे

१०.  संस्कृत भाषेचे शिक्षण, प्रचार आणि प्रसार करणे

पूर्णवेळ 

एकनाथ संशोधन मंदिराची स्थापना होत असताना अण्णासाहेब सेशन जज्ज म्हणून काम करत होते. परंतु संस्थेचा व्याप वाढत गेला. राहती जागा अपुरी पडत होती. संस्थेसाठी नव्या वास्तूची आवश्यकता होती. नवीन प्रकल्प हाती घेतले जात होते. नोकरीतून वेळ काढून या कामांना पुरेसा वेळ मिळत नव्हता. अण्णासाहेबांनी १९५७ साली स्वेच्छा निवृत्ती घेऊन संस्थेला पूर्ण वेळ देण्याचा निर्णय घेतला. 

संस्थेच्या वास्तूची निर्मिती करण्यासाठी अण्णासाहेबांनी एक कमिटी नेमली.  संस्थेच्या संकल्पित वास्तूकरिता श्री खडकेश्वर मंदिराच्या तत्कालीन विश्वस्तांकडून दीर्घ मुदतीच्या लीज वर जमीन मिळवण्यात  अण्णासाहेबांना  यश आले. वास्तु निर्मितीसाठी पैठण, अंबड आणि जालना तालुक्यातील आणि औरंगाबाद शहरातील अनेक धनिक आणि उदार अंतःकरणाच्या  एकनाथ भक्तांनी सढळ हाताने बांधकामास सहाय्य केले. इमारतीचा नकाशा प्रसिद्ध शिल्पशास्त्रज्ञ श्री माधवराव मराठे यांनी काढून दिला. बांधकाम श्री मराठे, श्री पाटील आणि श्री. चाफळकर यांच्या देखरेखीखाली १९५८ साली पूर्ण झाले. या कामात सर्व तंत्रज्ञांनी विना मोबदला आपली सेवा दिली. 

संस्थेच्या सभागृहाचे उदघाटन दिनांक ६ एप्रिल १९५८ रोजी मुंबई राज्याचे तत्कालीन राज्यपाल श्री. श्रीप्रकाशजी यांच्या हस्ते झाले. २५ जून १९६० रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री नामदार यशवंतरावजी चव्हाण यांनी संस्थेला भेट दिली. समृद्ध संग्रहालयाची गरज ओळखून त्याकरिता वरच्या  मजल्याच्या बांधकामासाठी मुख्यमंत्र्यांनी शासनातर्फे १५,००० रुपयाची बहुमोल देणगी दिली. अण्णासाहेबांनी हे काम अवघ्या एका वर्षात पूर्ण केले. त्याचबरोबर अण्णासाहेबांच्या वैयक्तिक देणगीतून अण्णासाहेबांच्या वडिलांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘गीता भवन’ या वास्तूची उभारणी करण्यात आली. 

व्याख्यानमाला 

संस्थेच्या उद्देश्यास अनुसरून अण्णासाहेबांनी अनेक प्रतिष्ठित वक्त्यांची व्याख्याने संस्थेत घडवून आणली. अण्णासाहेबांचे पिता, कै. गिरिराव अणा घाटे जहागीरदार यांच्या स्मरणार्थ सुरु केलेल्या व्याख्यान मालिकेत ही व्याख्याने आयोजित केली जात. अण्णासाहेबांनी यासाठी संस्थेला दिलेला निधी याच कामास वापरला जाई. या व्याख्यानमालेत अनंतरावजी आठवले, प्रा. प्रा. कृ. सावलापूरकर नागपूर, डॉ. ग. मो. पाटील औरंगाबाद, ह. भ. प. श्री धुंडामहाराज देगलूरकर, पंडित महादेव शास्त्री जोशी पुणे,  प्रा. के. मा. मुन्शी खामगाव, वाचस्पती विष्णूजी क्षीरसागर इत्यादी दिग्गजांची व्याख्याने अण्णासाहेबांनी करवून आणली. 

व्याख्यानाला येणारे वक्ते सहसा अण्णासाहेबांच्या घरीच उतरत. त्यांच्यासाठी अण्णासाहेबांनी घरात एक खास खोली राखून ठेवली होती. अण्णासाहेबांच्या सहचारिणी दमयंतीबाई आणि इतर कुटुंबीय या वक्त्यांच्या आदरातिथ्यात आनंदाने भाग घेत. 

संस्थेत दर रविवारी उपनिषदे, संत वाङ्मय, नारदभक्ती सूत्र यावर सकाळी आठ ते नऊ सत्संग नियमितपणे चालू असे. यामध्ये डॉ. ग. मो. पाटील आणि श्री. वि. प्र. मोहगावकर यांचे मार्गदर्शन साधकांना लाभत असे.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे वेदांत धर्माचे महान प्रचारक स्वामी चिन्मयानंद यांचे तीन गीता यज्ञ व त्यांच्या अधिकारसंपन्न शिष्यांचे ज्ञानयज्ञ संस्थेने वेगवेगळ्या वेळी आयोजित केले.  पहिला ज्ञानयज्ञ डिसेंबर १९५७ साली झाला. 

प्रकाशन कार्य 

संस्थेच्या स्थापनेपासून संस्थेने लहान-मोठी अनेक पुस्तके प्रकाशित केली. अण्णासाहेबांच्या हयातीत २८ पुस्तके प्रकाशित केली गेली. त्यातील २३ मराठीत, ४ पुस्तके हिंदीत आणि १ इंग्रजीत प्रसिद्ध करण्यात आले. 

शासनाच्या उपक्रमानुसार श्री एकनाथ यांच्या भावार्थ रामायणाची चिकित्सक व प्रमाणित प्रत तयार करण्याचे काम शासनाने एकनाथ संशोधन मंदिराला दिले. समितीचे अध्यक्षपद अण्णासाहेबांकडे  सोपवण्यात आले. समितीमध्ये श्री. न. शे. पोहनेकर, प्रा. सोनोपंत दांडेकर, प्रा. वि. पां.  देऊळगावकर,  ह. भ. प. श्री. धुंडामहाराज यांचा समावेश होता. या ग्रंथाच्या पहिल्या खंडाचे प्रकाशन २९ मार्च १९७० रोजी तत्कालीन शिक्षण मंत्री नामदार मधुकरराव चौधरी यांच्या हस्ते झाले. 

ग्रंथालय 

‘ग्रंथालय’ हा विषय अण्णासाहेबांना अतिशय प्रिय होता. अण्णासाहेबांच्या मते शिक्षण हे शाळा-कॉलेज मध्ये पूर्ण होत नाही तर त्याचा सतत व्यासंग असणे आवश्यक आहे. प्रौढांना आपले शिक्षण चालू ठेवण्यासाठी ग्रंथालयाची  नितांत आवश्यकता आहे. समाजात ठिकठिकाणी ‘सार्वजनिक वाचनालयाची’ सोय झाली पाहिजे आणि प्रौढांना वेगवेगळ्या विषयांवर ग्रंथ, पुस्तके, मासिके, वर्तमानपत्रे वाचावयास मिळाली पाहिजेत. 


ऑक्टोबर १९६४ मध्ये एकनाथ संशोधन मंदिराने एका समृद्ध ग्रंथालयाची स्थापना केली. सर्व प्रकारची विचारप्रवर्तक, शैक्षणिक, तत्त्वज्ञानपर अशी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि संस्कृत पुस्तके, मासिके आणि वृत्तपत्रे वाचनालयातर्फे मागवली जात. तसेच वाचनालयात विपुल ग्रंथसंपदा उपलब्ध करून दरवर्षी त्यात वाढ करण्यात येई. 

अण्णासाहेबांची मराठवाडा ग्रंथालय संघाच्या अध्यक्षपदी  निवड झाली. संस्थेला अण्णासाहेबांचे मार्गदर्शन फार मोलाचे ठरले. मराठवाडा ग्रंथालय संघास जेव्हा राज्य ग्रंथालय संघात विलीन केले गेले तेव्हा कायदेशीर सोपस्कार त्यांच्याच देखरेखीखाली झाले. मराठवाडा विभागीय ग्रंथालय संघ अस्तित्वात आल्यावरही संघास अण्णासाहेबांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. 

संस्कृत प्रचार 

संस्कृत भाषेचा प्रचार आणि प्रशिक्षण यावर अण्णासाहेबांचा भर होता.  संस्कृत समजल्याशिवाय संत वाङ्मय आणि मराठी भाषेचा अभ्यास आपल्याला करता येणार नाही हे अण्णासाहेब यांनी  जाणले होते.  यासाठी संस्कृत भाषेचे  प्रशिक्षण देण्याचा अण्णासाहेबांनी कायम प्रयत्न केला. 

महाराष्ट्र शासनाच्या ‘स्थायी संस्कृत समितीत’ अण्णासाहेबांना मानाचे स्थान होते. ‘स्थायी संस्कृत समितीत’ अनेक सभासदांनी हजेरी लावली पण अण्णासाहेब सन १९६७ पासून त्याचे सभासद होते आणि ते त्यांच्या अखेर पर्यंत राहिले. 

अण्णासाहेबांनी एकनाथ संशोधन मंदिर संस्थेतर्फे १९६३ सालापासून संस्कृत वर्गांची सुरुवात केली. श्री. गोविंदराव गोसावी गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे वर्ग चालत. संस्थेच्या संस्कृत वर्गात शिकवलेले विद्यार्थी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, पुणे यांच्या संस्कृत परीक्षेस बसत. १९७५ पर्यंत जवळजवळ ९५० विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या परीक्षा दिल्या. 

१९७५ साली संस्थेने संस्कृत पाठशाळेची पुनःरचना करून या कार्याकरिता स्वतंत्र कार्यकारिणीची स्थापना केली.  कार्यकारिणीचे अध्यक्षपद अण्णासाहेबांच्या कन्या डॉ. सौ. कुमुदिनी कुद्रीमोती  यांच्याकडे सोपवले. कार्यवाहक पदी अशोक देव यांची नियुक्ती केली. पाठशाळेच्या वेगवेगळ्या विभागात अध्ययन केंद्रे काढली आणि हजारो विद्यार्थ्यांना संस्कृतचे प्रशिक्षण दिले.  संस्कृत प्रचाराचे कार्य श्री. अशोक देव यांच्या परिश्रमामुळे मोठ्या प्रमाणावर झाले.