मनोगत 

स्वातंत्र्योत्तर काळातील संत वाङ्मयाच्या वाटचालीच्या इतिहासात न्या. बळवंतराव घाटे उर्फ अण्णासाहेब  यांच्या नावाला अनन्यसाधारण महत्व आहे. केवळ आध्यात्मिक विकास नव्हे तर सामाजिक बांधिलकीची प्रचिती देखील अण्णासाहेबांनी आपल्या वर्तणुकीतून दिली. प्रपंच आणि परमार्थ याचा समन्वय कसा साधावा हे अण्णासाहेबांच्या जीवनातून प्रतीत होते. 

अण्णासाहेबांचा जन्म एका जहागीरदार कुटुंबात झाला. गुलबर्गा येथे प्राथमिक शिक्षण आणि पुढील शिक्षण पुणे येथे घेऊन अण्णासाहेबांनी १९२५ साली पुणे येथून लॉ ची पदवी घेतली. काही वर्षे गुलबर्गा येथे वकिली केल्यानंतर तत्कालीन निजाम राज्यात त्यांनी मुन्सिफ पदी नोकरी पत्करली. पुढे २६ वर्षे त्यांनी अतिशय निस्पृहपणे न्यायदानाचे काम करून वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी सेवानिवृत्ती पत्करली. 

व्यवसायातून निवृत्ती घेणे म्हणजे व्यवसायात घ्याव्या लागणाऱ्या जबाबाबदाऱ्यांना रामराम करून नातवंडांत रममाण होणे असा निवृत्तीचा सर्वसामान्य अर्थ समाजात लावला जातो. परंतु अण्णासाहेबांसाठी निवृत्तीचा अर्थ निराळा होता. अण्णासाहेबांसाठी व्यवसायातून निवृत्ती म्हणजे केवळ अर्थार्जन हा प्रमुख उद्देश न ठेवता लोकोपयोगी कामासाठी स्वतःला अर्पण करणे. स्वतःचे व्यक्तित्व घडवण्यात समाजाने जे सर्व काही दिले त्याची अंशतः परतफेड करणे. निवृत्ती  अण्णासाहेब आपल्या या विचारांना खरे जागले. संत वाङ्मय आणि समाजकार्याला त्यांनी स्वतःला वाहून घेतले. अण्णासाहेबांच्या पश्चात त्यांची खरी ओळख त्यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी केलेल्या कामाने होते.

निवृत्ती पश्चात अण्णासाहेबांनी ‘एकनाथ संशोधन मंदिर’ या संस्थेची स्थापना केली. संत वाङ्मयाचा प्रचार करणे, नवीन लिखाणाचे प्रकाशन करणे, वाचनालये निर्माण करून लोकांना संत वाङ्मय उपलब्ध करून देणे, विचारवंतांची व्याख्याने आयोजित करून त्यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश होता. उद्देशास अनुसरून संस्थेने अनेक कार्यक्रम पूर्ण केले. 

संस्था नावारूपाला आणण्यासाठी अण्णासाहेबांचे थोरामोठ्यांशी असलेले घनिष्ठ संबंध  कामी आले. अण्णासाहेबांचे श्री. विनोबाजी भावे यांच्याशी असलेल्या आदरयुक्त आणि प्रेमाच्या संबंधांचा येथे विशेष उल्लेख करणे आवश्यक आहे. तसेच प्रसिद्ध इतिहासकार सेतूमाधव पगडी, ह.भ.प. धुंडामहाराज देगलूरकर, गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, पांडुरंगशास्त्री आठवले, स्वामी  चिन्मयानंद, स्वामी पुरुषोत्तमानंद, स्वामी रंगनाथानंद, गुरुवर्य गुळवणी महाराज, दत्त महाराज कवीश्वर इत्यादी अनेक मान्यवरांनी एकनाथ संशोधन मंदिराच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. 

अण्णासाहेबांची नाळ त्यांच्या यावली या मूळ गावाशी जोडली होती. नोकरीत असतांनाही अण्णासाहेब सुटी घेऊन यावलीस जात. निवृत्तीनंतर त्यांचे यावलीशी संबंध वाढले. त्यांच्या अनेक कार्यांनी गावाची मरगळ दूर होऊन एक नवीन चैतन्य निर्माण झाले. गावात अनेक सुधारणा झाल्या. गावातील दुर्व्यवहार थांबून सदाचाराची प्रचिती आली. यावली  गाव अण्णासाहेबांचे  कायम ऋणी झाले. 

अण्णासाहेबांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. अखेरच्या दिवसात अण्णासाहेब जरी शरीराने थकले होते तरी त्यांची कामाची उमेद शेवटपर्यंत कायम होती. अण्णासाहेब खऱ्या अर्थाने सार्थ जीवन जगले. अण्णासाहेबांच्या पश्चात एकनाथ संशोधन मंदिराने ‘स्मृतिगंध’ या नावाने अण्णासाहेबांच्या आठवणींवर एका पुस्तकाचे प्रकाशन केले. ह. भ. प. धुंडा महाराज, पांडुरंग शास्त्री आठवले, सेतुमाधवराव पगडी, स्वामी पुरुषोत्तमानंद आदी दिग्गजांनी आपल्या आठवणी नमूद करून अण्णासाहेब यांना आदरांजली वाहिली. त्यांचे दोन पुत्र, कन्या, सहकारी आणि कुटुंबीय यांनी देखील या संग्रहात आपल्या आठवणी मांडल्या आणि श्रध्दांजली वाहिली. अण्णासाहेबांचे चिरंजीव श्री. प्रभाकरराव घाटे, श्री. मधुकर राव जोशी आणि डॉ. अवचट यांच्या संपादन कौशल्याची प्रचिती या स्मृती संग्रहात येते. 

या संग्रहाचा आणि इतर माहितीचा आधार घेऊन अण्णासाहेब यांच्यावर चरित्रात्मक पुस्तक लिहावे ही इच्छा मला बरेच दिवसांपासून होती. त्याची पूर्तता आज होत आहे. अण्णासाहेबांना जे जाणत होते त्या पलीकडे जाऊन नव्या पिढीला अण्णासाहेब समजावेत हे या लेखनाचे प्रयोजन आहे. 

हे पुस्तक प्रकाशित करण्यात माझे कुटुंबीय, सहकारी, मित्र, प्रकाशक यांनी दिलेले प्रोत्साहन आणि मदतीशिवाय या पुस्तकाचे प्रकाशन शक्य नव्हते. या सर्वांचा मी शतशः ऋणी आहे.